स्टाफ अँकेडमीचे उत्साहात उद्घाटन
भोसला मिलीटरी कॉलेजमध्ये शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने आज स्टाफ अँकेडमी सुरु करण्यात आली. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे नाशिक विभाग कार्यवाह मिलिंद वैद्य यांनी दिपप्रज्वलन करून या अँकेडमीचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन डॉ.विजयप्रसाद अवस्थी,प्राचार्य डॉ.दिनेश नाईक उपस्थित होते. केमिस्ट्री विभागाचे डॉ.राजेंद्र नवले-पाटील यांनी अँकेडमी सुरु करण्यामागील उद्देश विषद केला. यावेळी श्री.वैद्य, डॉ.अवस्थी यांनी या उपक्रमांस शुभेच्छा दिल्या. या अँकेडमीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांनी श्रीकृष्ण चरित्र या विषयांवर पहिले पुष्प गुंफले, प्राचार्य डॉ.नाईक यांनी विविध प्रसंगातून भगवान श्रीकृष्ण व्यक्तीमत्व उलगडले. ते म्हणाले, भगवान श्रीकृष्ण यांचे व्यक्तीमत्व अलौकीक,अद्वितीय असे होते. त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला,पण त्याचे अलौकीक व्यक्तीमत्व कार्य समाजासमोर येण्याऐवजी त्यांच्या व्यक्तीमत्वाकडे बदनामीच्या अंगानेच आपण पहात आलो आहे. यावेळी त्यांनी जरासंध वध, कौरव,पांडव यांचे युध्दादरम्यानची भूमिका, युधीष्ठीर मैदानावत, अभिमन्यु,कर्णाचा पराक्रम, भागवत आणि गीतेतील श्रीकृष्णाचे वर्णन कुंतीचा शाप यासारखे विविध प्रसंग उदाहरमांसह मांडत भगवान श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद केले. गायत्री जोशी यांनी सुत्रसंचालन केले.