मानसशास्त्राची एक दिवसीय अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा भोसला महाविद्यालयात यशस्वीरित्या संपन्न.

Bhonsala Military College    29-Apr-2024
Total Views |


Psychology Dept. 
 
मानसशास्त्राची एक दिवसीय अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा भोसला महाविद्यालयात यशस्वीरित्या संपन्न.
भोसला सैनिकी महाविद्यालयामध्ये दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी मानसशास्त्र विषयाच्या द्वितीय वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. कार्यशाळेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर पी. व्ही. रसाळ उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थितीत इतर मान्यवरांमध्ये मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र देशमुख, सरपरशुरामभाऊ महाविद्यालयातील डॉ. मीनाक्षी गोखले व भोसला सैनिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. रसाळ यांनी अभ्यासक्रमाचा मसुदा हा अभ्यास मंडळातील सदस्यांनी अतिशय मेहनतीने तयार केल्याचे सांगितले. परंतु या मसुद्यामध्ये सुधारणेस वाव असून श्रोत्यांमध्ये उपस्थित प्राध्यापकांना त्यांनी असे आवाहन केले की त्यांनी त्यामध्ये योग्य त्या सुधारणा सुचवाव्यात. त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम झाल्याचे सांगत पुढील कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक यांनी श्रोत्यांना महाविद्यालयाची माहिती करून दिली तसेच ही कार्यशाळा वेळेत आयोजित करणे कसे महत्त्वाचे होते ते अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांनी करून दिला व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानसशास्त्र विभागातील प्राध्यापिका वृंदा शेलार यांनी केले
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मीनाक्षी गोखले यांनी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सेमिस्टर मध्ये एनईपी 2020 नुसार काय बदल केले आहेत तसेच कोणकोणते नवीन विषय अंतर्भूत केले आहे याचे सविस्तर सादरीकरण केले. सादरीकरणा दरम्यान त्यांनी श्रोत्यांना शंका विचारण्याचे आवाहन केले त्यानुसार श्रोत्यांनी अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित सुधारणा सुचविल्या. पाहुण्यांचा परिचय मानसशास्त्र विभागातील प्राध्यापिका कुमारी अविनाश रेणू यांनी करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शर्मिला भावसार यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा येथील प्राचार्य नरेंद्र देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टर मध्ये काय अंतर्भूत केले आहे ते सविस्तर श्रोत्यांसमोर मांडले. या सत्रामध्येदेखील श्रोत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पाहुण्यांना प्रश्न विचारले तसेच अभ्यासक्रमामध्ये उचित बदल सुचविले. पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन सौ. शर्मिला भावसार यांनी करून दिले.
कार्यक्रमाची सांगता समारोप समारंभाने झाली. समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉक्टर विजय प्रसाद अवस्थी हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्ष भाषणात डॉक्टर अवस्थी यांनी साहित्य व मानसशास्त्र यामध्ये कथा निकटचा संबंध आहे ते अधोरेखित केले. तसेच सिनेमा आणि मानसशास्त्र यांचा देखील कसा निकटचा संबंध आहे हे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे श्रोत्यांना सांगितले. येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अनेक गोष्टी मानवाशिवाय करता येणे शक्य होईल मात्र मानसशास्त्राची जागा कृत्रिम बुद्धिमत्ता कधीही घेऊ शकणार नाही असे त्यांनी पुढे सुचविले. त्यानंतर कार्यक्रमास पुणे, नगर, लासलगाव व नाशिक येथील महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली.